सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं. २ करकंब या कारखान्याच्या सन २०२५-२६ या हंगामाची सांगता व दोन्ही युनिटमध्ये उत्पादित एकूण १५ लाख ११ हजार ७५५ व्या साखर – पोत्यांचे पूजन व हंगामाची सांगता शुक्रवारी (दि. २०) झाली. कारखान्याचे फायनान्स मॅनेजर दिलीप लव्हटे व केन मॅनेजर संभाजी थिटे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. संस्थापक – चेअरमन मा.आ. बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या हंगामात युनिट नं.१ कडे १६ लाख ५२ हजार १८२ मे.टन व युनिट नं. २ कडे ५,२४,४५१ असे एकूण २० लाख ८६ हजार ६३३ मे.टन उसाचे गाळप झाले. त्यातून १५ लाख ११ हजार ७५५ क्विंटल साखर पोती उत्पादित झाली. दोन्ही युनिटचे मिळून ७ कोटी ९ लाख ७० हजार ५०० युनिट वीज विक्री करण्यात आली आहे. या हंगामात युनिट नं. १ चे डिस्टिलरी विभागाकडे शुगर सिरपपासून ३ कोटी ५७ लाख लीटर इथेनॉल उत्पादन झाले.
या हंगामासाठी उसाची उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने हंगाम लवकर बंद झाला. दोन्ही युनिटकडे गाळपास आलेल्या उसास हंगामाच्या सुरुवातीपासून १० दिवसाला ऊस बिलाचे पेमेंट अदा केले. गाळपास आलेल्या उसास प्रति मे.टन ३,०२५ रुपयांप्रमाणे बिल अदा केले. १० फेब्रुवारीअखेर ऊस बिलापोटी आजअखेर रू.५९६ कोटी २२ लाख व ३१ जानेवारीअखेर तोडणी वाहतूक बिलासाठी रू.१५४ कोटी ३ लाख अदा केले. याप्रसंगी कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, युनिट नं. २ चे जनरल मॅनेजर पोपट येलपले, चीफ केमिस्ट अनिल जगताप, चीफ इंजिनिअर संजय कैचे, ईडीपी मॅनेजर रमेश खेडकर, कामगार प्रतिनिधी अनिल वीर व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पगारवाढ अन् बक्षीस
दोन्ही युनिटकडील यशस्वी कामकाजासाठी कारखान्यात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना पंधरा दिवसांच्या पगाराइतकी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच कारखान्याचे युनिट नं.१ व २ कडील सर्व कामगारांना जानेवारीपासून १० टक्के वाढ लागू करण्यात येत आहे. हा हंगाम सभासद, ऊस पुरवठादार, मजूर, वाहनमालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले.

















