पाडेगाव ऊस संशोधन केंद्रात अत्याधुनिकरणाच्या कामाला सुरुवात

सातारा : पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील प्रस्तावित ऊस संशोधन केंद्राची नवीन प्रशासकीय इमारत, शेतकरी प्रशिक्षण इमारत तथा अतिथीगृह आणि कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विद्यापीठ अभियंता मिलींद डोके, संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे उपस्थित होते. हे ऊस संशोधन केंद्र २०३२ मध्ये शताब्दी वर्ष पूर्ण करणार आहे. संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी यावेळी केले.

संशोधन केंद्राच्या अत्याधुनिकीकरणासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे सहकार्याने हा निधी उपलब्ध झाला. तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे व पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष तुषार पवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा उपयुक्त ठरला. यासाठी कृषी खात्याच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांचे सहकार्य आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, माजी संशोधन संचालक, डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे सांगण्यात आले. गेल्या ९३ वर्षांपासून या संशोधन केंद्राने अधिक उत्पन्न आणि साखर उतारा देणारे १७ सुधारीत वाण प्रसारीत केलेले असनू अर्थिकदृष्टया किफायतशीर ऊस लागवड तंत्रज्ञानासंबंधी ११० शिफारशी दिल्या आहेत, असे कुलगुरू खर्चे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here