सोनपेठ: ट्वेंटीवन शुगर्स कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने, अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमित देशमुख, उपाध्यक्ष विजय देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष पाटील व मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवशीय ‘शिवार फेरी’ उपक्रम राबवण्यात आला. ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांच्या संकल्पनेतून ट्वेंटीवन शुगर्स व गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या फेरीत २०२५-२६ हंगामामधील पूर्व हंगामी, सुरू व खोडवा ऊस पिकाच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत तपोवन, खामगाव, पिंपरी बुद्रुक, डीग्रस, मोहा, लिंबा, लोहिग्राम, वंदन, खळी, गंगाखेड आणि सोनखेड या गावांमध्ये ऊस पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तपोवन येथील शेतकरी चंद्रकांत कराड यांच्या शेतावर रोप लागवड करण्यापूर्वी रोपांचे शेंडे कट करण्याचे महत्त्व सांगून त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तर डीग्रस येथे शेतकरी पंडित मुठाळ यांच्या शेतात तुटाळ लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक अमोल पाटील यांनी जमिनीच्या प्रकारानुसार खत व्यवस्थापन, खते मातीआड करणे आणि जेठा कोंब काढण्याच्या तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला.
सद्यस्थितीत ऊस पिकात दिसणारी चाबुक काणी, गवताळ वाढ, तसेच गुलाबी खोड पोखरणारी अळी व लवकर येणाऱ्या खोडकिडीमुळे होणारी पोंगेमर यावर ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी उपाययोजना सुचवल्या. वंदन येथील शेतकरी विजय बेद्रे यांनी सात फुटावर केलेल्या ऊस लागवडीची पाहणी करत, ऊसाला माती लावण्यासाठी मोठी बांधणी करताना घ्यावयाची काळजी व इतर तांत्रिक मुद्द्यांवर उपस्थितांशी संवाद साधला. या शिवार फेरीमध्ये राजेश कोळेकर, सिद्धेश्वर बडे, बाळासाहेब सोनवणे, चंद्रकांत बडे, मधुकर कराड, जगदीश सोनवणे, दत्ता बडे, विजय मुठाळ, अभय मुठाळ, विश्वनाथ नाटकर, सुधाकर नाटकर, नारायण मुठाळ, पांडुरंग देशमुख, महेश देशमुख, नाथराव देशमुख, विजय बेद्रे, राधाकिशन जाधव यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

















