सातारा : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी संस्थापक पॅनेल मैदानात – माजी चेअरमन अविनाश मोहितेंची घोषणा

सातारा : काही महिन्यांवर आलेली यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कोण लढणार, की निवडणूक बिनविरोध होणार, अशी चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात सुरू असताना निवडणूक लढतीचे संकेत मिळत आहेत. सत्ताधारी गटाचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या विरोधात कारखान्याच्या इतिहासात प्रथमच निवडणुकीचे नेतृत्व एक महिला करणार आहे. कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या पत्नी सौ. अर्चना मोहिते यांनी रणशिंग फुंकले असून तशी घोषणा त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पार पडली. रघुनाथ दादा पाटील यांची शेतकरी संघटना अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे सांगली जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी जाहीर केले.बैठकीत सुरुवातीला कार्यकत्यांनी कारखान्याच्या कारभाराबाबत भावना व्यक्त केल्या.

अविनाश मोहिते म्हणाले, कार्यकर्ते साथ देणार असतील तर सभासदांच्या हितासाठी निवडणूक लढवण्यास आपण खंबीर आहोत. आपल्याला शारीरिक त्रास असला तरी शारीरिक त्रासापेक्षा सभासदांना होणारा मानसिक त्रास मोठा आहे. तो कमी करण्यासाठी आजपर्यंत प्रयत्नशील राहिलो, यापुढेही आपण सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहणार आहे.

बैठकीस कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुरेश पाटील, माजी संचालक जयशंकर यादव, पांडुरंग पाटील, सर्जेराव लोकरे, उदय शिंदे, राष्ट्रवादीचे कराड तालुका अध्यक्ष संतोष थोरात, अमरसिंह थोरात, बाळासाहेब निकम, उत्तमराव जाधव, सुभाष पाटील, वसंतराव पाटील, डॉ. अजित देसाई, जे. के. जगताप यांच्यासह कार्यक्षेत्रातील सुमारे ३०० निवडक कार्यकत्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here