सांगली : जिल्ह्यातील ऊस गाळपात ‘सोनहिरा’ तर साखर उत्पादनात ‘दत्त इंडिया’ची आघाडी

सांगली : जिल्ह्यात यंदाच्या गाळप हंगामात १० सहकारी आणि सहा खाजगी साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले. या हंगामातील गळीत हंगामाची सांगता झाली आहे. या कारखान्यांनी ७९,९९,१२१ टन उसाचे गाळप करत ८४ लाख ५७ हजार ४५५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखरेचा उतारा १०.५७ टक्के इतका राहिला आहे. हंगामात साखर उत्पादनात दत्त इंडिया आघाडीवर आहे. कारखान्याने ८,२३,२१७ टन गाळप करत १०,०२,६८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गाळपात सोनहिरा अव्वल आहे. वांगी (ता. कडेगाव) सोनहिरा साखर कारखान्याने ९,७३,०४१ टन उसाचे गाळप केले आहे. तर साखर उताऱ्यात राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा उतारा १२.५३ टक्के आहे.

जत, आटपाडी, खानापूर, या दुष्काळी तालुक्यातील साखर कारखान्यांनी गाळप आणि साखरेचे उत्पादनही चांगले घेतले आहे. नागेवाडीच्या यशवंत शुगरने सर्वात कमी गाळपात आणि साखरेचे उत्पादन घेतले आहे. यंदा उसाला पहिली उचल ३७५१, तर मागील हंगामातील २०० रुपये असा दर द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. मात्र, साखर कारखान्यांनी याबाबत भूमिका घेतली नाही. त्यामुळे ऊस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, पण यामध्ये तोडगा निघाला नाही. परिणामी, हंगामाच्या प्रारंभापासून गाळपाला फारशी गती नव्हती. परंतु साखर कारखान्यांनी दर जाहीर करत दराची कोंडी फोडली. त्यानंतरच गाळपाला गती आली. आता ८० लाख टन ऊस गाळप करून हंगामाची सांगता झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here