साखर उद्योगाची कोंडी, ग्रामीण अर्थचक्र धोक्यात येण्याची भीती : सद्गुरू श्री श्री साखर कारखाना जी.एम.डी. जाधव

सांगली : साखर दर आणि ऊस दर यातील विसंगती हा साखर उद्योग अडचणीत येण्याचे मुख्य कारण आहे. शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिले द्यायची असतील तर ऊस किमतींचा संबंध साखर दराशी जोडणे आवश्यक आहे, एमएसपी वाढवणे गरजेचे आहे, असे नीती आयोगाच्या ऊस आणि साखर उद्योग टास्क फोर्सने २०२० मध्येच स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे साखर उद्योग सावरण्यासाठी एमएसपीचे वास्तववादी पातळीवर पुनरावलोकन करणे, ऊस दर आणि साखर/ उपउत्पादन उत्पन्न यांचा अधिक वैज्ञानिक संबंध जोडणे, इथेनॉल धोरणात सातत्य आणि स्पष्टता आणणे यासह को-जनरेशनला व्यवहार्य दर आणि वेळेवर देयके मिळणे, अनियंत्रित क्षमता वाढीचा पुनर्विचार यावर भर देण्याची गरज आहे, असे मत राजेवाडी – आटपाडी (सांगली) येथील सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे जी.एम.डी. उदय जाधव यांनी दैनिक ‘पुण्यनगरी’शी बोलताना व्यक्त केले.

याबाबत उदय जाधव म्हणाले की, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक आणि सर्वात मोठा ग्राहक देश आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या क्षेत्राचा परिणाम सुमारे ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर, आणि साखर कारखान्यांतील सुमारे ५ लाख कामगारांवर होतो. आज या उद्योगासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कारखान्यांच्या हाती येणाऱ्या पैशांपेक्षा बाहेर जाणारी देयके जास्त आणि जलद गतीने वाढत आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ पासून साखरेचा दर प्रती किलो ३१ रुपयांवर कायम ठेवला आहे. नीती आयोगाच्या २०२० च्या टास्क फोर्सने एमएसपी किमान ३३ रुपये करण्याची शिफारस केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाले. दुसरीकडे उसाची एफआरपी सातत्याने वाढत गेली. ही विसंगती दूर करण्याची गरज आहे. नवीन किंवा विस्तारित कारखान्यांमुळे उसासाठी स्पर्धा वाढली आहे. परिणामी, गाळप हंगाम ९०-१०० दिवसांवर येऊन थांबत आहे. याचा सर्वात जास्त ताण शेतकरी आणि कारखाना या दोन्ही घटकांवर येत आहे. साखर उद्योग दर, खर्च, कोटा, निर्यात, इथेनॉल धोरण, स्पर्धा, कर्जाचा दाब यांच्या कोंडीत सापडला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here