महाराष्ट्र : साखर उद्योगातील अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्वाची बैठक

पुणे : विविध कारणांनी राज्यातील साखर उद्योग संकटात सापडला आहे. सध्या विविध कारखान्यांवर बँकांकडील १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेशी तरलता नसल्याने राज्य सरकारने या कर्जाचे पुनर्गठण करून दोन वर्षांचा विलंबावधी देण्याची गरज आहे. याशिवाय ‘एफआरपी’च्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाले आहेत. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवारी (दि. २४) महत्त्वाची बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांसह आमदार, विविध संस्थांचे प्रमुख या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

सद्यस्थितीत वाढीव एफआरपीमुळे साखर कारखान्यांचे अर्थकारण कोलमडल्याचे उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने यंदाच्या गाळप हंगामासाठी १०.२५ टक्के साखर उताऱ्याकरिता ३,५५० रुपये एफआरपी निश्चित केली. ही रक्कम देण्यासाठी कारखाने बँकांकडून साखरेच्या तारणावर प्रति क्विंटल कर्ज घेतात. सध्या बँका प्रति टन २,३०९ रुपये कर्ज देतात आहे. त्यामुळे एफआरपी देण्यासाठी आणखी १,१६० रुपयांची गरज भासते. ही तफावत दूर करण्यासाठी राज्य सरकारने ५०० रुपये प्रति टन अनुदान द्यावे, अशी मागणी कारखान्यांनी केली आहे. याशिवाय, कर्ज परतफेडीसाठी सात वर्षांची मुदत द्यावी, अशी मागणीही कारखानदारांची आहे. गेल्या दोन वर्षातील वाढलेल्या एफआरपीच्या तुलनेत साखरेचा विक्री दर वाढवावा, इथेनॉलचे दर, वापर वाढवावा याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी मागणी होत आहे. याबाबत निर्णयासाठी होणाऱ्या बैठकीस, आमदार दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विनय कोरे, अभिमन्यू पवार, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांसह विविध विभागांचे सचिव उपस्थित राहणार आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here