नांदेड : नांदेड विभागातील २५ साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची समाप्ती झाली आहे. या विभागातील ऊस गाळप हंगाम समाप्तीकडे झुकला असून काही दिवसांत लातूर जिल्ह्यात सुरू असलेले पाच कारखानेही गाळप पूर्ण करतील, अशी स्थिती आहे. चार जिल्ह्यांतील ३० पैकी २५ साखर कारखान्यांचे गाळप आटोपला आहे. केवळ लातूर जिल्ह्यातील पाच कारखाने सुरू आहेत. आजपर्यंत एक कोटी २५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. एक कोटी १८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ९.४२ टक्के नोंदविण्यात आला आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा गाळप हंगाम सुरू केलेल्या ३० कारखान्यांमध्ये २० खासगी, तर १० सहकारी कारखान्यांचा समावेश होता. विभागात एकूण एक कोटी २५ लाख ७४ हजार ५५६ टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. यात तूर जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे ५४ लाख ९९ हजार टन गाळप झाले आहे. परभणी जिल्ह्यात ३३ लाख टन, नांदेड जिल्ह्यात २१ लाख टन, तर हिंगोली जिल्ह्यात १६ लाख टन गाळप झाले आहे. सहकारी कारखान्यांनी सुमारे ४० लाख टन, तर खासगी कारखान्यांनी सुमारे ८५ लाख टन उसाचे गाळप केले आहे.


















