सांगली : जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २८० कोटी रुपये थकले

सांगली : जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात १६ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यापैकी सहा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर उस बिले जमा केली आहेत. तर १० कारखान्यांकडून २८० कोटी ७३ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहे. याबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात थकीत कारखान्यांची सुनावणी घेण्यात आली. यावेळी काही कारखानदारांनी आर्थिक अडचणींचा हवाला देत ३० मार्चपर्यंत मुदत मागितली. त्यानुसार प्रशासनाने अंतिम संधी दिली आहे. मात्र, या मुदतीनंतरही शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी न दिल्यास संबंधित कारखान्यांवर महसुली जप्तीची (आरआरसी) कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ऊस बिले थकली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बिले कधी मिळणार याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिक कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. जिल्ह्यात गळीत हंगामात १६ कारखान्यांनी ७९ लाख ९९ हजार १२१ टन ऊस गाळप केला. यापासून ८४ लाख ५७ हजार ४५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. मात्र, कारखान्यांनी एफआरपी देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले. सुरुवातीला एकूण ३६५ कोटी २१ लाख रुपये थकीत होते. प्रशासनाच्या नोटिसांनंतर काही कारखान्यांनी रक्कम अदा केली असली तरी अजूनही मोठी थकबाकी शिल्लक आहे. याबाबत प्रादेशिक सहसंचालकांनी कारवाईचा इशारा दिला आहे. मुदतीत ऊस बिले न दिल्यास आरआरसी कारवाईचा प्रस्ताव साखर आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here