सातारा : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांची प्रतीक्षा

सातारा : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून जोरदार चर्चा रंगत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अंतिम मतदार यादी अद्याप सार्वजनिक झालेली नसल्याने त्याची उत्सुकता आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र कऱ्हाड, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव तालुक्यात विस्तारले आहे. सर्वाधिक सभासद संख्या कऱ्हाड तालुक्यात आहे.खानापूर तालुक्यातीलही काही गावांत कारखान्याचे सभासद आहेत. मात्र, मुख्य चार तालुक्यांवर सत्ता कोणाची येणार ? यावर बरेच गणित अवलंबून आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील तालुके निर्णायक ठरत असल्याने सध्या प्रत्येक आघाडीने त्या-त्या तालुक्यांवर फोकस केला आहे. संस्थापक पॅनेलने शड्डू ठोकला आहे. त्याला प्रतिउत्तर देण्याची भोसले गटाने तयारी केली आहे.

कृष्णा कारखान्यावर २०२१ मध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने दहा हजारांच्या फरकाने निर्विवाद विजय मिळवत वर्चस्व ठेवले. सुमारे १० हजारांच्या मताधिक्याने मिळालेला विजय ऐतिहासिकच ठरला. तो भोसले गटासाठी महत्त्वाचा ठरला. यंदाच्या निवडणुकीत अंदाजे ४२ ते ४३ हजार मतदार असतील. आता यंदाच्या निवडणुकीत नवीन सभासदांची नोंदणी अन् अपात्र सभासदांचा पेच महत्त्वाचा ठरेल. सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होतील, अशी चर्चा आहे. सत्ताधारी विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भोसले विरुद्ध मोहिते अशी तुल्यबळ लढत यंदाही पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. यादी प्रसिद्ध झाली नसल्याने प्रत्यक्ष मैदानात सत्ताधारी विरोधक शांत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here