सांगली: गेल्या पाच वर्षांपासून कवठेमहांकाळ तालुक्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा महांकाली साखर कारखाना बंद आहे. कारखाना बंद झाल्यानंतर शेकडो कामगार बेरोजगार झाले. अनेक कुटुंबांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले. काहींना उपजीविकेसाठी स्थलांतर करावे लागले. कारखान्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योग आणि दुकानेही बंद पडली. एकेकाळी हजारो लोकांच्या उपजीविकेचा आधार असलेले हे औद्योगिक केंद्र आज ओस पडले असून त्याचा मोठा फटका तालुक्याला बसत आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कारखाना सुरू झाल्यास तालुक्याच्या आर्थिक चक्राला नवसंजीवनी मिळू शकते.
महांकाली कारखाना नानासाहेब सगरे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आला. कारखान्याने तालुक्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावली होती. कारखान्यात सुमारे ११०० कामगार कार्यरत होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खात्रीशीर बाजारपेठ मिळत होती. आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि व्यवस्थापनातील अडथळ्यांमुळे कारखाना बंद पडला. कारखाना बंद पडल्याने आज शहरातील मुख्य बाजारपेठेत मंदीचे वातावरण आहे. व्यापारात घट झाली असून, रोजगाराच्या संधी जवळजवळ संपल्या आहेत. औद्योगिक पर्याय नसल्याने युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, एमआयडीसीसारखे पर्यायी प्रकल्पही रखडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. त्यामुळे महांकाली कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील म्हणाले की, महांकाली साखर कारखाना बंद पडल्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले. शहराचे अर्थचक्र थांबले आहे. हा कारखाना पुन्हा सुरू झाला तर रोजगार निर्माण होऊन बाजारपेठेला नवसंजीवनी मिळू शकते.


















