जालना : अंबड, घनसावंगी तालुक्यातील उसाला बाहेरील कारखान्यांचा मिळाला आधार

जालना : अंबड व घनसावंगी तालुक्यातील जवळपास १० ते १२ लाख टन ऊस बाहेरगावच्या साखर कारखान्यांनी गाळपास नेल्याचे सांगण्यात येते. या कारखान्यांनी ३१०० रुपयांपेक्षा अधिक दर देत एकाच टप्प्यात बिल दिले आहे. त्यामुळे चालू गळीत हंगामात अंबड, घनसावंगी तालुक्यात उसाचा अतिरिक्त प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दूर होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. बाहेरील मुळा, प्रवरा, रामेश्वर, प्रसाद शुगर, संत एकनाथ, वृद्धेश्वर, क्रांती शुगर पारनेर, गंगामाई, कन्नड, बारामती अॅग्रो, एडेश्वरी, गुळमेश्वर, बळिराजा गूळ पावडर, शरद, जय महेश, योगेश्वरी, जय भवानी यासह अनेक कारखान्यांनी ऊस तोडणी केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, तालुक्यातील समर्थ साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक १ (अंकुशनगर) येथे १० लाख ४० हजार ४३० टन उसाचे गाळप होऊन ६ लाख ६३ हजार ८५८ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११.०७ टक्के आहे. युनिट क्रमांक २ (सागर), तीर्थपुरी कारखान्याने ४ लाख ५७ हजार ९४० टन उसाचे गाळप करून ३ लाख ९ हजार ५७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. येथे सरासरी साखर उतारा १०.८१ टक्के आहे. समृद्धी साखर कारखाना (रेणुकानगर) येथे ६ लाख ८० हजार टन उसाचे गाळप झाले असून सरासरी उतारा ११ टक्के आहे. ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग (गूळ पावडर) युनिटकडून १ लाख ७२ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. स्थानिक कारखान्यांकडून तोडणी मिळण्यास होत असलेला विलंब आणि उसाचे वाढलेले वय लक्षात घेता परजिल्ह्यातील कारखान्यांनी या भागात शिरकाव करत मोठ्या प्रमाणात ऊस गाळपास नेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ऊस गाळपाविना ऊस उभा राहण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार डॉ. हिकमत उढाण यांनी बाहेरील कारखान्यांना आमंत्रित करून या भागातील अतिरिक्त ऊस गाळपासाठी पर्याय उपलब्ध करून दिला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here