सातारा : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षी किसन वीरचे ४.५३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले. तर भागीदारी तत्त्वावर असलेल्या खंडाळा साखर कारखान्याचे २.४५ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. कारखान्याने जिल्ह्याबाहेरून यावर्षी ऊस गाळपास आणला. कारखान्याने नोव्हेंबरअखेरचे ऊस बिल जमा केले असून, त्यानंतर एकही बिल जमा न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मार्चअखेर मुळे शेतकऱ्यांपुढे देणी भागवण्याचा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.
याबाबत किसन वीर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी सांगितले की, कारखान्याला शासनाकडून कोणतीही उचल मिळत नसल्याने सध्या केंद्र शासनाकडून कारखान्याला साखर विक्रीचा जो काही कोटा प्राप्त होतो, त्याप्रमाणे साखर विक्री करून त्या पैशातून देणी भागवावी लागत आहेत. मेअखेपर्यंत सर्व ऊस उत्पादकाची बिले जमा करण्याचे कारखान्याचे धोरण असून, पुढील वर्षांपासून कारखाना मूळपदावर येईल. दरम्यान, गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाचे ऊसबिल एकरकमी चौदा दिवसात देणे बंधनकारक असतानाही चार महिन्यांपासून ऊसबिले रखडल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शेतकऱ्यांना सोसायट्यांचे पीककर्ज भरण्यासोबतच खत दुकानदार, ट्रॅक्टरवाले, मजूर यांचीही देणी द्यावी लागतात. ऊस खोडव्याच्या भरी, नवीन लागण करणे यासारखी कामे ऊसबिलाच्या भरवशावर केली जात असतात; परंतु अद्याप पैसेच हातात न आल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होऊन बसली आहे.


















