कोल्हापूर : यंदा जागतिक तेल बाजारातील स्थिती चिंताजनक आहे. गतवर्षी सरासरी प्रतिबॅरल ६० डॉलर्सवर स्थिर असलेले क्रूड ऑईलचे दर यंदा १०० डॉलर्सची मर्यादा ओलांडून पुढे गेले आहेत. ब्राझीलकडे साखर उत्पादनाचे इथेनॉलकडे वळविण्याचे तंत्रज्ञान जगात अद्ययावत आहे. यामुळे या भडकलेल्या क्रूड दराचा लाभ ब्राझील उठल्याशिवाय राहणार नाही. ब्राझीलमध्ये साखर उत्पादन कमी झाले, तर साखर उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताला मोठी संधी मिळू शकते. मध्यपूर्वेत चिघळलेले युद्ध, जागतिक तेल बाजारात क्रूड ऑईलचे चढलेले भाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाने घेतलेली लोळण या तिन्ही कारणांमुळे जागतिक बाजारात साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही. या स्थितीत भारताला निर्यातीसाठी चांगले दिवस आल्याचे साखर उद्योग विश्लेषकांचे मत आहे.
देशात आगामी साखर हंगामासाठी सुमारे ६५ लाख मेट्रिक टन साखर आरंभीची शिल्लक असणार आहे. त्यामुळे भारतीय साखर कारखानदारीच्या अर्थकारणाला आशेचा किरण दिसतो आहे. युद्ध स्थितीत क्रूड ऑईलच्या भडकलेल्या दराने ब्राझीलची साखर कारखानदारी साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याच्या तयारीत आहे. जागतिक बाजारात ब्राझिलियन साखरेची आयात जर कमी झाली, तर भारतीय साखरेला उठाव करता येणे शक्य आहे. निर्यातीचा आणखी १५ ते २० लाख मेट्रिक टनाचा कोटा वाढविला, तरीही जागतिक बाजारात साखर चार पैसे अधिक मिळवून देऊ शकते. यातून देशातील कारखानदारीवर निर्माण झालेला आर्थिक ताण मोकळा होण्यास मदत होऊ शकते.

















