पुणे : जिल्ह्यातील नऊ सहकारी आणि सहा खासगी अशा एकूण १५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात सहभाग नोंदविला होता. यावर्षी सुमारे चार ते साडेचार महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा गळीत हंगाम ऊस उपलब्धता चांगली असल्याने उशिरापर्यंत चालेल, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात ऊस लागवड घटणे, पाणीटंचाई आणि वाढत्या उन्हामुळे यात बदल झाला. ऊस पुरवठ्यात घट झाल्याने हंगाम लवकर आटोपता घ्यावा लागला आहे. सध्या १४ कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. सध्या माळेगाव आणि श्री साई प्रिया शुगर्स हे कारखाने सुरू असून तेही लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
शिरूर तालुक्यातील जातेगाव येथील व्यंकटेश शुगर, तसेच इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा, कर्मयोगी शंकरराव पाटील, बारामती अॅग्रो, श्रीनाथ म्हस्कोबा या कारखान्यांनी मार्चमध्येच हंगाम संपवला. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत १ कोटी १६ लाख ४८ हजार ९३३ मे. टन ऊस गाळप केले असून त्यापासून सरासरी ९.८१ टक्क्यांच्या उताऱ्याने १ कोटी १४ लाख २४ हजार ६१० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. गळीत हंगाम आटोपत आल्याने बहुतांश साखर कारखान्यांच्या परिसरात शुकशुकाट पसरला असून ऊस तोडणी कामगार परतीच्या प्रवासाला लागले आहेत. जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यातील कारखान्यांनी टप्प्याटप्याने गळीत बंद करण्यास सुरुवात केली. गळीत हंगाम लवकर संपल्याचा मोठा फटका ऊस तोडणी कामगारांना बसला आहे. तोडणी कामगारांचा कालावधी कमी झाल्याने त्यांचे उत्पन्न घटले आहे. अनेक मजूर आपापल्या गावी परतू लागले असून कारखाना परिसरातील हालचाल मंदावली आहे.


















