अहिल्यानगर: जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी आर्थिक अडचणीचे कारण देत शेतकऱ्यांना उसाची एफआरपी देण्यासाठी शासनाकडे प्रतिटन ५०० रुपये अर्थसहाय्याची मागणी केली आहे. या प्रस्तावासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. या समितीने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या मताचाही विचार करावा, अशी मागणी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे यांनी केली. या अर्थसहाय्याचा गैरवापर होवू नये यासाठी शासनाने कारखानानिहाय थकीत एफआरपी असलेल्या शेतकऱ्यांची यादी साखर आयुक्तांकडून मागवावी. अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण डीबीटी या तत्वावर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे हे निवेदन तहसीलदारांमार्फत देण्यात आले. नायब तहसिलदार राजवळ यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची थकीत असलेली एफआरपीची रक्कम कारखान्यांना न देता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावी. कारखान्यांना सरसकट प्रतिटन ५०० रुपये अनुदान न देता कारखाना निहाय थकीत एफआरपीच्या रकमेइतकेच अर्थसहाय्य करावे. अन्यथा शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानावर कारखानदार ताव मारतील. यावेळी सुनिता वानखेडे, नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी, रवी वानखेडे, मधू काकड, मयूर भनगडे आदी उपस्थित होते.


















