नवी दिल्ली : 31 मार्च 2026 च्या अहवालानुसार, सध्या सुरू असलेल्या इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) 2025-26 मध्ये इथेनॉल पुरवठा सुमारे 417 कोटी लिटरपर्यंत पोहोचला असून, 1058 कोटी लिटरच्या करारबद्ध प्रमाणाच्या सुमारे 39 टक्के पुरवठा झाला आहे. फीडस्टॉकनिहाय पाहता, मका-आधारित इथेनॉलचा पुरवठा सुमारे 159 कोटी लिटर झाला असून, सुमारे 479 कोटी लिटरच्या करारबद्ध प्रमाणाच्या तुलनेत सुमारे 33 टक्के पुरवठा झाला आहे. दरम्यान, सरप्लस फूड ग्रेन्स (SFG) मधून सुमारे 89 कोटी लिटर (38 टक्के) इथेनॉल मिळाले, तर खराब अन्नधान्य (DFG) मधून सुमारे 21 कोटी लिटर (39 टक्के) इथेनॉलचा पुरवठा झाला. एकूणच धान्य-आधारित इथेनॉलचा पुरवठा सुमारे 269 कोटी लिटर झाला असून, 766 कोटी लिटरच्या करारबद्ध लक्ष्याच्या सुमारे 35 टक्के पुरवठा पूर्ण झाला आहे.
साखर-आधारित इथेनॉलमध्ये उसाच्या रसापासून (SCJ) लक्षणीय वाढ दिसून आली असून सुमारे 112 कोटी लिटर पुरवठा झाला आहे, जो करारबद्ध प्रमाणाच्या 68 टक्के आहे. बी-हेवी मोलॅसिस (BHM) आणि सी-हेवी मोलॅसिस (CHM) मधून अनुक्रमे सुमारे 31 कोटी लिटर (27 टक्के) आणि 5 कोटी लिटर (36 टक्के) इथेनॉल पुरवठा झाला आहे. महिन्यानुसार पुरवठ्याचा कल पाहता, हंगामभर सातत्याने वाढ दिसून आली. नोव्हेंबर 2025 मध्ये सुमारे 36 कोटी लिटर पुरवठ्यापासून सुरुवात होऊन जानेवारी 2026 मध्ये सुमारे 102 कोटी लिटरचा मासिक उच्चांक गाठला. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात प्रत्येकी सुमारे 89 कोटी लिटर इतका स्थिर पुरवठा राहिला. देशातील साखर व बायोफ्युएल संघटनांनी सरकारकडे इथेनॉलवर चालणाऱ्या कुकस्टोव्हच्या जलद प्रसारासाठी धोरण तयार करण्याची मागणी केली आहे. यामुळे इथेनॉलची मागणी वाढेल आणि वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल.


















