सांगली : एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा पाणी संघर्ष समितीचा इशारा

सांगली: ऊस गळीत हंगाम संपून अनेक दिवस झाले तरी कडेगाव, खानापूर व कऱ्हाड तालुक्यातील काही कारखान्यांनी अद्यापही एफआरपीची संपूर्ण रक्कम दिलेली नाही. साखर कारखानदारांनी ऊस बिले तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावीत अन्यथा पाणी संघर्ष समितीतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व साखर आयुक्त यांना निवेदन दिले असून आता त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. तरीही बिले न दिल्यास संबंधित कारखान्यांवर कोल्हापूर येथील सर्किट बेंचमध्ये दावा दाखल करणार आहे, असा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

देशमुख म्हणाले की, साखर कारखान्यांनी चौदा दिवसांत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक कारखानदारांनी ऊस बिले थकवली आहेत. त्यामुळे बँका, सोसायटीचे कर्ज काढून ऊस शेती करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. कडेगाव, खानापूर व कऱ्हाड तालुक्यातील काही कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिलेली नाही. ती तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावी या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले जाईल. यावेळी, वसंत इनामदार, तानाजी भोसले, बजरंग अडसुळ, नामदेव रास्कर, सिराज पटेल, इम्रान पटेल, मोहन जाधव, शशिकांत रास्कर, आप्पासाहेब यादव यांच्यासह पाणी संघर्ष समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here