नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे ईंधन बाजारात मोठा चढ-उतार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारताला वाढीव दराने इंधनाची आयात करावी लागत आहे. सध्या पारंपरिक इंधनावर विमानांचे परिचालन केले जाते. पारंपरिक इंधनावरील भार कमी करण्याचा प्रयत्न म्हणूनही ‘एटीएफ’मध्ये इथेनॉल मिश्रणाला केंद्र सरकारने परवानगी दिली असून इथेनॉल आणि सिंथेटिक हायड्रोकार्बनचे मिश्रण करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इंधनावरील खर्च कमी होणार आहे. सद्यस्थितीत जपान, ब्रिटन या देशांकडून विमानांमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इथेनॉलचा वापर वाढविणे बंधनकारक करण्यात येत आहे.
सध्या देशांतर्गत उड्डाणांसाठी हवाई इंधनात इथेनॉल मिसळण्याविषयी कोणतेही लक्ष्य निश्चित करण्यात आलेले नाही. एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२७ पर्यंत हवाई इंधनात एक टक्के ‘एसएएफ’ मिसळण्याचे लक्ष्य आहे. तर, २०२८ पर्यंत दोन टक्के आणि २०३०पर्यंत ५ टक्के ‘एसएएफ’ वापरण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूएल (एसएएफ) प्रामुख्याने खाद्यतेल, कृषी अवशेष आणि कचयापासून बनवले जाते. अशा प्रकारच्या इंधनाचे पारंपरिक इंधनात मिश्रण करण्यात आले तरी विमानाच्या सध्याच्या इंधन पुरवठा यंत्रणेत मोठे बदल करण्याची गरज भासत नाही. पारंपरिक इंधनाच्या तुलनेत ‘एसएएफ’ इंधनामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी होते. यासाठी सरकारने ‘एटीएफ’च्या व्याख्येत बदल केला आहे.

















