नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळावीत यासाठी केंद्र सरकारने सुमारे सहा दशके जुन्या शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 च्या जागी नवा शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 2026 चा मसुदा तयार केला असून त्यावर 20 मे पर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. या मसुद्यानुसार साखर कारखान्यांना ऊस खरेदीच्या 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विहित मुदतीत ऊस बिले न केल्यास थकीत रकमेवर वार्षिक 15 टक्के व्याज आकारण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे.
मसुद्यात असेही नमूद करण्यात आले आहे की, एखाद्या साखर कारखान्याने संपूर्ण साखर वर्षात शेतकऱ्यांची थकबाकी चुकती न केल्यास त्याला तीन महिन्यांच्या आत संपूर्ण रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करावी लागेल, आणि त्याच रकमेतून शेतकऱ्यांचे पेमेंट केले जाईल. पेमेंट रखडण्याच्या स्थितीत शेतकऱ्यांना पर्यायी संरक्षण मिळावे, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे.
खांडसरी आणि गूळ उत्पादक युनिट्सनाही नव्या नियमांच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव मसुद्यात आहे. या युनिट्सना आता परवाना घेणे अनिवार्य असेल आणि शेतकऱ्यांना उचित व लाभदायक किंमत म्हणजेच एफआरपी देणे बंधनकारक राहील. मसुद्यात नमूद करण्यात आले आहे की, अलीकडच्या वर्षांत या युनिट्सनी मोठ्या प्रमाणावर ऊस खरेदी केल्यामुळे साखर कारखान्यांना कच्च्या मालाची टंचाई भासू लागली आहे, आणि हे पाऊल बाजारातील समतोल राखण्यास उपयुक्त ठरेल.
नव्या साखर कारखान्यांच्या स्थापनेचे नियमही अधिक कडक करण्यात आले आहेत. आता कोणत्याही विद्यमान कारखान्याच्या 25 किलोमीटरच्या परिसरात नवा कारखाना उभारता येणार नाही, तर पूर्वी ही मर्यादा 15 किलोमीटर होती. महाराष्ट्रात हा नियम पूर्वीपासून लागू आहे, आता या नियमात उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्याचाही समावेश होणार आहे. याशिवाय नवा कारखाना उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची बँक गॅरंटी द्यावी लागेल आणि निर्धारित कालावधीत उत्पादन सुरू करणे अनिवार्य असेल.
इथेनॉलला साखर उद्योगाचे प्रमुख उत्पादन म्हणून मान्यता देण्याचा प्रस्तावही मसुद्यात समाविष्ट आहे. त्यानुसार एखादा कारखाना उसाचा रस, मळी किंवा साखरेपासून थेट इथेनॉल तयार करत असल्यास 600 लिटर इथेनॉल हे एक टन साखरेच्या समतुल्य मानले जाईल. यामुळे कारखान्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यास शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट करणे सोपे होईल.
एफआरपी निश्चित करण्याच्या प्रक्रियेतही बदल सुचवण्यात आला आहे. नव्या मसुद्यानुसार उसाची उत्पादन खर्च, पर्यायी पिकांपासून मिळणारा नफा, साखरेची बाजारातील उपलब्धता, रिकव्हरी दर तसेच मळी, बगास आणि प्रेस मड यांसारख्या उप-उत्पादनांपासून होणारे उत्पन्न या सर्व बाबी एफआरपी ठरवताना विचारात घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.


















