पुणे : साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) गेल्या अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. दुसरीकडे उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) सातत्याने वाढ होत असल्याने राज्यातील साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर साखरेचा सध्याचा प्रतिकिलो ३१ रुपये असलेला किमान विक्री दर वाढवून ५० रुपये करावा, तसेच एफआरपीची रक्कम दोन हप्त्यांत देण्याची मुभा साखर कारखान्यांना द्यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी राज्यातील साखर उद्योगाने केंद्र सरकारच्या अभ्यास समितीकडे केली आहे.
निती आयोगाचे माजी सदस्य डॉ. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय अभ्यास समितीने बुधवारी (४ नोव्हेंबर) पुण्यात महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित विविध घटकांशी चर्चा केली. या बैठकीत वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय), राज्य सहकारी साखर संघ, साखर आयुक्तालय आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपापल्या मागण्या व समस्या समितीसमोर मांडल्या.
एफआरपीसाठी दोन हप्त्यांचा प्रस्ताव
सध्या ऊस पुरवठ्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देण्याचे बंधन आहे. मात्र, कारखान्यांची आर्थिक स्थिती आणि साखरेच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता या नियमात बदल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार १०.२५ टक्के साखर उताऱ्याच्या आधारावर पहिला हप्ता ३० दिवसांत द्यावा, तर उर्वरित रक्कम गाळप हंगाम संपल्यानंतर महसुली उत्पन्न विभागणी (आरएसएफ) निश्चित झाल्यावर द्यावी. अशा प्रकारे एफआरपी दोन हप्त्यांत देण्याची शिफारस केंद्र सरकारने करावी, अशी भूमिका साखर उद्योगाने मांडली.
साखरेचा उत्पादन खर्च ५,०३८ रुपये प्रतिक्विंटल
२०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी महाराष्ट्रात साखरेचा निव्वळ उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ४,५७९.४९ रुपये आहे. त्यात कारखान्यांचा वाजवी नफा जोडल्यास हा खर्च ५,०३८ रुपयांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सध्याचा बाजारभाव आणि उत्पादन खर्च विचारात घेऊन साखरेचा एमएसपी वैज्ञानिक पद्धतीने निश्चित करावा, अशी मागणी ‘विस्मा’ने केली आहे.
केंद्र सरकारने एफआरपीमध्ये वाढ करतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या त्याच बैठकीत साखरेच्या ‘एमएसपी’मध्येही वाढ करण्याचा निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी आगामी गळीत हंगामापासून करावी, असेही सुचविण्यात आले आहे.
इथेनॉल धोरणातील बदलांचा कारखान्यांना फटका
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमाला प्रतिसाद देत साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, चालू आणि आगामी हंगामात उसाचा रस, सिरप तसेच बी-हेवी मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीबाबत केंद्राने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे इथेनॉल खरेदी धोरणात सुधारणा करून कारखान्यांच्या गुंतवणुकीला संरक्षण द्यावे, अशी मागणी ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी समितीसमोर उद्योगाची भूमिका सविस्तर मांडली.
शेतकरी संघटनांकडूनही विविध मागण्या
बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनीही अनेक महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. केंद्रीय कृषिमूल्य आयोग (सीएसीपी) रद्द करावा, दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट काढून टाकावी, एफआरपीऐवजी पूर्वीप्रमाणे किमान वैधानिक किंमत (एसएमपी) लागू करावी, तसेच साखर आयुक्तालयाचे नामकरण ऊस आयुक्तालय असे करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.याशिवाय उसाच्या उत्पादन खर्चावर आधारित आणि साखर उताऱ्यानुसार दर निश्चित करावा, अशीही मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली. या बैठकीस शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, अनिल घनवट, प्रकाश बालवडकर, अॅड. योगेश पांडे, विठ्ठल पवार, जालिंदर पाटील यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.
‘व्हीएसआय’कडून संशोधनाधारित अहवाल सादर होणार
उसाची एफआरपी निश्चित करण्याची पद्धत, ऊस लागवड व उत्पादन खर्च, यांत्रिकीकरणातील अडचणी, ऊस उपपदार्थांपासून मिळणारे उत्पन्न आणि भविष्यातील शाश्वत उत्पन्नवाढीच्या संधी यांचा अभ्यास करून संशोधनाधारित विकास मॉडेल तयार करण्याच्या सूचना समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश चंद यांनी व्हीएसआयला दिल्या आहेत.त्यानुसार पुढील महिनाभरात केंद्र सरकारकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी दिली. या बैठकीला सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडगावकर, विस्माचे पदाधिकारी, व्हीएसआयचे प्रतिनिधी आणि साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित होते.
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याशीही चर्चा
केंद्रीय अभ्यास समितीने राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. राज्यातील साखरेचा एकूण साठा, केंद्र सरकारचे नवीन निर्बंध आणि आगामी गाळप हंगामासंदर्भातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्यासह विविध घटकांच्या प्रतिनिधींनीही आपली भूमिका मांडली. समितीने सर्व घटकांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले असून, साखर उद्योगाच्या अडचणींवर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी व्यक्त केली.


















