सोलापूर : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच तत्पर असलेल्या बार्शी तालुक्यातील तुर्क-पिंपरी (केवड) येथील बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजने एक कौतुकास्पद पाऊल उचलले असून आता सभासद शेतकऱ्यांना मोबाईलवरून ऊस शेतीचे अचूक मार्गदर्शन मिळणार आहे. याकरिता कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या नामांकित कंपनीशी करार केला आहे. सभासद शेतकऱ्यांच्या ऊस पिकावर देखरेख ठेवण्यासाठी व अचूक मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) तंत्रज्ञानाचा वापर कारखान्याने सुरू केला आहे.
या उपक्रमामुळे उपग्रहाच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पीकाची वाढ कशी होत आहे ते आता मोबाईलवरून पाहता येणार आहे. शेतकऱ्यांना विविध खते व पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे. विविध रोगांपासून ऊस पीकाचे संरक्षण, कोणताही कीड व रोग येण्याआधीच त्याची पूर्वसूचना मिळणार आहे. यावेळी उपळाई खुर्दचे सरपंच संदीप पाटील, जनरल मॅनेजर कैलास मते, मुख्य शेतकी अधिकारी शहाजी हांडे, महिंद्रा कंपनीचे मंदार घाडगे, योगीराज ननवरे, गणेश चव्हाण, वैभव लटके, योगेश कदम व कर्मचारी उपस्थित होते.


















