सांगली : सध्या वाळव्याच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्यातील भाऊबंदकी चर्चेत आली आहे. या ठिकाणी चेअरमन वैभव नायकवडी यांच्याविरोधात किरण नायकवडी, गौरव नायकवडी या वारसदारांमधील भांडणे टोकाला गेली आहेत. त्याचे परिणाम नेमके काय होणार, याची चिंता व्यक्त केली जात आहे. कधीकाळी आदर्श ठरलेला ‘हुतात्मा पॅटर्न’चा प्रवास काही कारखान्यांप्रमाणे निवळणार की संघर्षामुळे अधिक अडचणीचा होणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीवर दृष्टिक्षेप टाकला असता अशा अनेक घटना पहायला मिळतात, असे लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वसंतदादा कारखान्यातही अशीच स्थिती पंचवीस वर्षांपूर्वी झाली होती. वसंतदादा कारखान्याच्या दोन निवडणुकांत वसंतदादांचे वारसदार आमने-सामने आले होते. वसंतदादा बैंक, बाजार समिती, जिल्हा बँक अशा सहकारी संस्थांच्या निवडणुकांतही हा सिलसिला कायम राहिला होता.
सहकारातील भाऊबंदकीला सोनहिरा, राजारामबापू, क्रांती, मोहनराव शिंदे यांसारखे काही कारखाने अपवाद आहेत. वसंतदादा कारखान्याच्या २००० च्या निवडणुकीत प्रकाशबापू पाटील विरुद्ध विष्णुअण्णा पाटील आमने-सामने होते. या निवडणुकीला नंतर स्थगिती मिळाली. पुढील निवडणुकीत प्रकाशबापू यांच्या पॅनल विरोधात मदन पाटील यांचे पॅनल होते. गेल्या अडीच दशकात हे चित्र बदलले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या बाजूने मदन पाटील यांचे कुटुंबीय उभे राहिले. मात्र, विशाल पाटील काँग्रेसमध्ये तर मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई भाजपमध्ये असल्याने पुन्हा औपचारिकदृष्ट्या ते विरोधकच आहेत. वसंतदादा बँकेच्या निवडणुकीतही प्रकाशबापू विरुद्ध मदन पाटील असा संघर्ष होता. बाजार समिती आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेतही अशीच स्थिती राहिली. विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या प्रयत्नाने सध्या वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनीकडे सुपूर्द केला गेला. आता हा कारखाना कर्जमुक्तीच्या जवळपास पोहचला आहे.


















