सातारा : केंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण कायद्यानुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफआरपी देणे साखर कारखान्यांवर बंधनकारक आहे. मात्र, अनेक कारखाने नियमांचे उल्लंघन करत आहेत. शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत आहेत. या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत, रयत क्रांती संघटनेने जिल्ह्यातील वर्धन अॅग्रो, ओंकार शुगर आणि शिवनेरी शुगर या कारखान्यांना निवेदन दिले. कारखान्यांनी साखरेच्या पोत्यावर कर्ज मिळवले. मात्र, त्याचा वापर कोठे केला याचे उत्तर द्यावे. शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तात्काळ अदा करावीत, अन्यथा कारखान्यांसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे नेते तथा ऊस नियंत्रण समितीचे सदस्य सचिन नलवडे यांनी दिला.
जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी येत असून, शेतकरी संतप्त झाले आहेत. उसाची देयके त्वरित द्यावीत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या विषयावर कारखान्यांना निवेदने देण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन, थकित देयके अदा करावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, कराड तालुकाध्यक्ष नितीन कुलकर्णी, युवा आघाडी अध्यक्ष सौरभ चव्हाण, पुसेसावळी भागाचे युवा नेते सुहास पिसाळ आणि शेतकरी उपस्थित होते.


















