नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुडुचेरी येथे सुरू असलेल्या मतमोजणीदरम्यान निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करत 200 जागांचा टप्पा ओलांडण्याच्या तयारीत आहे. तर आसाममध्येही भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. तमिळनाडूमध्ये यावेळी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसत आहेत. अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्ष सर्वात मोठी ताकद म्हणून समोर आला असून बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) स्पष्ट बहुमत मिळवताना दिसत आहे. पुडुचेरीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्तेत येण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. एका बाजूला विजयाचा जल्लोष सुरू असताना, दुसऱ्या बाजूला आसनसोल, बॅरकपूर आणि बाकुरा येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापटीच्या घटना समोर आल्या आहेत. केरळमध्ये यूडीएफने 140 सदस्यीय विधानसभेत 103 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एलडीएफ 35 जागांवर मर्यादित राहिला, तर एनडीएला केवळ 3 जागा मिळाल्या. काँग्रेस 64 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून आययूएमएलने 22 जागा जिंकल्या आहेत. तसेच केरळमध्ये भाजपनेही आपली उपस्थिती नोंदवत नेमोम, चथन्नूर आणि कजाकुट्टम या जागांवर विजय मिळवला आहे.
पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय
महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बारामती मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांनी 2 लाख 18 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.















