जालना : ग्रामीण भागातील वंचित, गरजू आणि विशेषतः ऊसतोड कामगार कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, जालना आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यायी उपजीविका’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणाद्वारे ऊसतोड कामगारांना पारंपरिक मजुरीला फाटा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब गुंजाळ, डॉ. हनुमंत आगे, पी. डी. जोशी, प्रकल्प व्यवस्थापक अश्वजित जाधव आणि एमआयएस समन्वयक अनुप मोरे यांच्या उपस्थितीत झाले.
अप्पासाहेब उगले म्हणाले की, केवळ मजुरीवर अवलंबून न राहता ग्रामीण नागरिकांनी उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधणे ही काळाची गरज आहे. शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, लघुउद्योग आणि बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवता येते, असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण सत्रात तज्ज्ञांनी उपस्थितांना व्यवसायाची निवड कशी करावी, बाजारपेठेचा अभ्यास, उत्पादन प्रक्रिया, आर्थिक नियोजन आणि शासकीय योजनांची माहिती दिली. स्वयंपूर्ण होण्यासाठी आत्मविश्वास आणि कौशल्य विकास किती महत्त्वाचा आहे, यावरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला. या उपक्रमात विविध गावांतील महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


















