सातारा : ऊसतोड कामगारांच्या पालांवर पोहोचली आरोग्य पथके; गर्भवती महिला आणि बालकांची तपासणी सुरू

सातारा : ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबीयांसह साखर कारखान्यांच्या परिसरात तसेच शेतशिवारातील तात्पुरत्या पालांमध्ये वास्तव्यास दाखल झाले आहेत. या स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबातील लहान मुले आणि गर्भवती महिलांना नियमित आरोग्य तपासणीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या सूचनेनुसार आरोग्य पथके थेट ऊसतोड कामगारांच्या पालांवर जाऊन गर्भवती महिला आणि बालकांची तपासणी करत आहेत.

या मोहिमेचे नियंत्रण जिल्हा आरोग्य अधिकारी करत असून, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक आणि आरोग्यसेविका यांचाही मोहिमेत सहभाग आहे. या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची ‘४ डी’ पद्धतीने आरोग्य तपासणी केली जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

‘जननी पोर्टल’वर नोंदणी; गर्भवतींना नियमित उपचार

ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमधील प्रत्येक गर्भवती महिलेचे स्वतंत्र प्रसूतीपूर्व आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संबंधित महिलांच्या आरोग्य कार्डवर ‘आभा’ क्रमांकाची नोंद करून त्यांची माहिती ‘जननी पोर्टल’वर अद्ययावत केली जाणार आहे.या महिलांची हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तातील साखर आणि एचआयव्ही तपासणी करण्यासह सोनोग्राफीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या तसेच आवश्यक लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत विशेष आरोग्य सेवा दिल्या जाणार आहेत.

आरोग्य सर्वेक्षणादरम्यान गंभीर रक्तक्षय, उच्च रक्तदाब, मधुमेह, जुळी गर्भधारणा किंवा प्रसूतीदरम्यान गुंतागुंतीची शक्यता असलेल्या महिलांची ‘अतिजोखमीच्या गर्भवती’ म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे. अशा महिलांचा नियमित पाठपुरावा करून त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञांची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.तसेच जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत १०८ आणि १०२ या क्रमांकांच्या मोफत रुग्णवाहिका सेवेद्वारे गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्याची आणि प्रसूतीनंतर घरी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

स्थलांतरित कुटुंबांच्या आरोग्य सुरक्षेवर भर

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे म्हणाले, “ऊसतोड कामगारांची नियमित आरोग्य तपासणी ही केवळ वैद्यकीय गरज नसून त्यांच्या सामाजिक आणि शारीरिक सुरक्षिततेशी तसेच कुटुंबाच्या भवितव्याशी निगडित महत्त्वाची प्रक्रिया आहे. हंगामी स्थलांतरामुळे ऊसतोड कामगारांच्या आरोग्यावर मोठा ताण येतो. याचा सर्वाधिक परिणाम गर्भवती महिला आणि बालकांवर होतो. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे कामगारांच्या कुटुंबांमधील कुपोषण रोखण्यास मदत होईल.”

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here