सांगली : ऊसतोड मजुरांच्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांचे शालेय शिक्षण खंडित होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शिक्षणाची अखंडता कायम राहावी, या उद्देशाने येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर यंदाही ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी ‘साखर शाळा’ सुरू करण्यात आली आहे. ऊसतोड मजुरांची मुले आपल्या मूळ गावी शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र पूर्ण करून आता दुसऱ्या सत्रासाठी क्रांती साखर शाळेत दाखल झाली आहेत. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांनी संपूर्ण आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी खर्च केले. गरिबी किंवा अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे कोणाचेही शिक्षण अपूर्ण राहू नये, हे बापूंचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या कारखान्यात सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी आमदार अरुण लाड यांनी यावेळी केले.
दरवर्षी गळीत हंगामादरम्यान साखर शाळा सुरू ठेवली जाते. यंदा १०० हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेणार आहेत. कार्यक्रमात लाड यांच्यावतीने मुलांचे स्वागत करण्यात आले. आजचे जग स्पर्धेचे आहे. अशा परिस्थितीत शिक्षण हेच या मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप, सकस आहार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऊसतोडणीच्या कामासाठी आई-वडिलांसोबत स्थलांतरित होणाऱ्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही. कार्यक्रमाला सेक्रेटरी वीरेंद्र देशमुख, सुरक्षा अधिकारी के. एन. लाड, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, हेड टाईम कीपर शंकर पवार, स्वच्छता अधिकारी सुनील एडके, विश्वजित पाटील, किशोर जाधव, संजय जाधव, हणमंत लाड, अरुण भोसले, अजय पाटील उपस्थित होते.


















