नवी दिल्ली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी उसाच्या योग्य व लाभदायक दरात (FRP) वाढ करून तो 385 रुपये प्रति क्विंटल (3850 रुपये प्रति टन) करण्याची मागणी केली आहे. वाढत्या खत आणि इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर सध्याचा 365 रुपये प्रति क्विंटल एफआरपी अपुरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने 2026–27 हंगामासाठी 10.25 टक्के साखर उताऱ्यावर आधारित एफआरपी 365 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 2.81 टक्क्यांनी जास्त आहे.
राजू शेट्टी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, सरकारने ठरवलेला हा दर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खर्चाची भरपाई करण्यास अपुरा आहे. उसाच्या उत्पादन खर्चाबाबत सरकारने केलेल्या 182 रुपये प्रति क्विंटलच्या अंदाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, खतांच्या वाढत्या किंमती, हवामानातील अनिश्चितता आणि डिझेल दरवाढ यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतो, कारण शेतीची मशागत, कापणी आणि वाहतूक या सर्व प्रक्रियांमध्ये डिझेलचा वापर होतो. कापणीनंतर उसाच्या वाहतुकीचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.
शेट्टी यांनी सरकारला आव्हान देत म्हटले की, प्रस्तावित दरांवर कृषी विद्यापीठांच्या शेतात ऊस पिकवून दाखवावा. कागदावर केलेली गणिते सोपी वाटतात, परंतु प्रत्यक्षात खर्च अधिकच असतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच, 365 रुपयांचा एफआरपी उत्पादन खर्चापेक्षा 100.5 टक्के जास्त असल्याचा सरकारचा दावा व्यवहार्य नसल्याचे त्यांनी सांगितले, कारण शेतकऱ्यांना अनेक अशा अडचणींचा सामना करावा लागतो ज्या या गणनेत समाविष्ट नाहीत.
शेट्टी यांनी सुचवले की, हा एफआरपी 2026-27 मध्ये लागू होणार असल्याने सरकारकडे पुनर्विचार करण्यासाठी वेळ आहे आणि तो वाढवून 385 रुपये प्रति क्विंटल करावा.पश्चिम आशियातील संघर्षामुळे खतांच्या किमती 40-50 टक्क्यांनी वाढल्या असून इंधन दरही सतत वाढत आहेत. अशा परिस्थितीत सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

















