सोलापूर : वेणुनगर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कृषी महाविद्यालय मंजूर झाले आहे. कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर हे नवीन कृषी महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने नमूद केल्यानुसार नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने विहित केलेल्या सर्व मानकांची आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेची पूर्तता करत असल्याचे हमीपत्र या महाविद्यालयाने शासनाला सादर करावे लागणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत मंजूर झालेल्या या महाविद्यालयात ६० विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमता असणार आहे.
जिल्ह्यात सध्या वडाळा (ता. उत्तर सोलापूर), अकलूज व पानीव (ता. माळशिरस) या ठिकाणी कृषी महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यानंतर हे चौथे महाविद्यालय असणार आहे. या महाविद्यालयात व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, प्रवेश नियामक प्राधिकरण यांच्या प्रवेश नियमानुसार प्रवेश प्रक्रिया होणार आहे. विद्यापीठ तपासणी समितीच्या अहवालातील निष्कर्षात नमूद बाबींची त्रुटींची पूर्तता विहित कालावधीत करावी लागणार आहे. या बाबींची पूर्तता केल्यानंतर महाविद्यालयास प्रवेश प्रक्रिया राबविण्यास अनुमती देण्यात येणार आहे.


















