उसाची एफआरपी ३,६५० रुपये झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान, कमाई प्रतिटन १०० रुपयांनी वाढणार

सांगली : केंद्र सरकारने यंदाचा ‘एफआरपी’ १०.२५ टक्के बेसिक उताऱ्यावर आधारित निश्चित केला आहे. प्रत्येक ०.१ टक्के वाढीव उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल ३.५६ रुपये प्रोत्साहन मिळणार आहे. विशेष म्हणजे साडेनऊ टक्क्यांखाली उतारा गेल्यासही दरात कपात केली जाणार नाही. एफआरपीमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत२.८१ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हंगाम २०२६-२७ साठी उसाची एफआरपी प्रतिटन ३,६५० रुपये होणार आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या ३५५० रुपयांच्या तुलनेत यंदा १०० रुपयांची वाढ केली आहे. मात्र, जिल्ह्याचा सरासरी उतारा १०.५७ टक्के गृहित धरल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन किमान १२० रुपये अधिक दर मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अपवाद वगळता सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने ३५५० ते ३६५० रुपये दर देतील, असा अंदाज आहे.

जिल्ह्यात २०२५-२६ हंगामात १६ साखर कारखान्यांनी ७९ लाख ९९ हजार ९२१ टन ऊस गाळप करून ८४ लाख ५७ हजार ४५५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जिल्ह्याचा सरासरी उतारा १०.५७ टक्के राहिला. काही कारखान्यांचा अपवाद वगळता यंदा प्रतिटन सरासरी ३,५५० रुपयांपासून ३,६५० रुपये दर मिळण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याच्या सरासरी उताऱ्यानुसार साडेदहा टक्के उताऱ्यास प्रतिटन सुमारे ३ हजार ६७० रुपये मिळतील. ११ टक्के उताऱ्यास ३ हजार ९१७, तर १२ टक्के उताऱ्यास अधिकचे पैसे मिळू शकतात. दरम्यान, उत्पादन खर्च वाढला असल्याने शेतकऱ्याच्या पदरात अधिकचे काही पडण्याची शक्यता कमीच दिसत आहे. फक्त उच्च उताऱ्याच्या उसाला यंदा अधिक आर्थिक फायदा होणार आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी ऊस तोडणी-वाहतुकीचे दर अव्वाच्या सव्वा लावून ‘एफआरपी’ला खो घातला जाते आहे असा आरोप केला आहे. तर हंगाम अधिक दिवस चालावा, अशी अपेक्षा दत्त इंडियाचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी व्यक्त केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here