सांगली : संख (ता. जत) येथील बिरादार वस्तीवर उसाची लागण करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील नातेवाइकांमध्ये तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी उमदी पोलिसांत नऊ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी सिदगोंडा शकरेप्पा बिराजदार (वय ६५, रा. बिरादार वस्ती, संख, ता. जत) यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दि. ३ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास संख येथील शेतात उसाची लागण करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी बेकायदा जमाव जमवून फिर्यादी तसेच त्यांच्या मुलांना व नातेवाइकांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
या मारहाणीत कोयता, लोखंडी रॉड व काठ्यांचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपींनी डोक्यात, हातावर वार करून गंभीर जखमी केले तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी महादेव बसाप्पा बिरादार, शिवाप्पा शटगोंडा बिरादार, श्रीकांत शिवाप्पा बिरादार, शटगोंडा शिवाप्पा बिरादार, गुराप्पा श्रीकांत बिरादार, अमर यलगोंडा बिरादार, आकाश राजेंद्र बिरादार, मल्लिकार्जुन शटगोंडा बिरादार व यलगोंडा बसाप्पा बिरादार (सर्व रा. बिरादार वस्ती, संख, ता. जत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उमदी पोलिस करत आहेत.


















