महाराष्ट्र : राज्यात ऊस गाळपात पुणे, सोलापूर तर साखर उत्पादन, उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात ऊस गाळपात पुणे आणि सोलापूर विभाग अग्रस्थानी राहिला असून, साखर उत्पादन आणि उताऱ्यामध्ये कोल्हापूर विभागाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सरासरी १०५ दिवस चाललेल्या या हंगामात १० कोटी ४५ लाख ५८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले. सरासरी ९.४९ टक्के उताऱ्याने एकूण ९९ लाख १८ हजार मेट्रिक टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यात गेल्यावर्षी, हंगाम २०२४-२५ मध्ये १९९ साखर कारखान्यांनी ८५३.८२ लाख मे. टन ऊस गाळप केले होते. म्हणजेच गेल्या वर्षापेक्षा यंदा सुमारे १९१.७६ लाख मे. टनांनी अधिक ऊस गाळप पूर्ण झाले असून, १८२.५१ लाख क्विंटल साखर उत्पादनात वाढ झालेली असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दैनिक ‘पुढारी’ला दिली.

राज्यात २०९ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. या कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता सुमारे १० लाख ७ हजार ८०० मेट्रिक टन आहे. ऊस गाळपात आघाडीवर असलेल्या पुणे विभागातील ३२ कारखान्यांनी २२२ लाख ५५ हजार मे. टन तर सोलापूरमधील ४९ कारखान्यांनी एकूण २२२ लाख ५ हजार मे. टन ऊस गाळप केला. कोल्हापूर विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तेथील ३८ कारखान्यांनी २१० लाख ४६ हजार मे. टन ऊस गाळप केले. मात्र, ११.०२ टक्के हा सर्वाधिक साखर उतारा व २३१.९१ लाख क्विटल साखर उत्पादन करून कोल्हापूरने बाजी मारत वर्चस्व कायम ठेवले. याबाबत साखर आयुक्त संजय कोलते म्हणाले की, सुरुवातीला १०५ लाख मे. टन साखर उत्पादन अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९९ लाख मे. टन साखर उत्पादन झाले. अंदाजात मोठा फरक पडलेला नाही. उसाची वाढलेली दैनिक गाळप क्षमता आणि १५० दिवस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून ऊस उत्पादकता वाढीवर सांघिक भर देण्याची आवश्यकता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here