सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आगामी हंगामात ६ लाख टन गाळपाचा निर्धार करण्यात आला. उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत साखर विक्री समिती, गळीत हंगाम २०२६-२७ करिता झालेल्या ऊस नोंदी, तोडणी-वाहतूक करार तसेच शेती विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सचिव मुकेश पवार यांनी विषयसूचीचे वाचन केले. वाहतूक करारातील येणेबाकी वसुली, उत्पादन, इंजिनिअरिंग आणि डिस्टिलरी विभागातील कामकाजावरही चर्चा झाली. विभागप्रमुखांनी आपापले अहवाल सादर केले. सर्व विषयांवर तातडीने निर्णय घेण्याचे ठरले.
गेल्या २० वर्षांत प्रथमच अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बैठकीत ऊस वाहतूक करार सुरू ठेवणे, ५० अंगद गाड्या, बैलगाड्यांची दुरुस्ती, बॉयलरची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी हंगामात सहा लाख टन ऊस गाळप करून राज्यात उच्चांकी साखर उतारा मिळवण्याचा संकल्प संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, शेती अधिकारी सर्जेराव वावरे यांच्यासह सर्व खातेप्रमुख बैठकीस उपस्थित होते. दरम्यान, दुपारी चारनंतर आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली. वैभव नायकवडी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी पुन्हा मांडली.


















