पुणे : केंद्र सरकारने ‘ऊस नियंत्रण आदेश १९६६’ रद्द करून त्याऐवजी नवीन ‘ऊस नियंत्रण आदेश २०२६’ लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या नव्या आदेशामध्ये शेतकरीहिताच्या तरतुदींना धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. केंद्र सरकारने नव्या आदेशाचा मसुदा जाहीर करून देशभरातून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सोमवारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत संघटनेच्या विविध मागण्या आणि हरकती जाणून घेण्यात आल्या. बैठकीला संघटनेचे नेते कालिदास आपेट, शिवाजीनाना नांदखिले, बाळासाहेब पठारे, वस्तादभाऊ दौंडकर, राहुल मस्के यांच्यासह साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी उपस्थित होते. शेतकरी संघटनेची भूमिका केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली जाईल, असे आश्वासन साखर आयुक्तांनी दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना रघुनाथदादा पाटील यांनी आरोप केला की, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सहकार्याने सध्याचे सरकार ऊस उत्पादकांच्या हिताच्या तरतुदींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करीत आहे. नव्या आदेशाद्वारे शेतकरीविरोधी धोरणे लागू केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. एफआरपीसाठी यापूर्वी साडेआठ टक्के साखर उतारा गृहीत धरला जात होता. मात्र, तो वाढवून सव्वा दहा टक्के करण्यात आला असून हा बदल शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. नव्या आदेशात हा उतारा पूर्ववत करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच, उपपदार्थांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील हिस्सा शेतकऱ्यांना देण्याची तरतूद असलेले पाचवे (अ) कलम हटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, हा बदल कोणत्याही परिस्थितीत मान्य केला जाणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्र सरकारने ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन ३ हजार ६५० रुपयांची एफआरपी जाहीर केली असली तरी उत्पादन खर्च फक्त १ हजार ८०० रुपये प्रतिटन गृहीत धरल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. राज्य सरकारच्या शेतमाल भाव समितीने उत्पादन खर्च ४ हजार ४०० रुपये प्रतिटन दर्शविला असताना केंद्र सरकारने कमी खर्चाचा आधार कसा घेतला, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.


















