एफआरपी वाढीने साखर उद्योगाची कोंडी, साखरेच्या एमएसपी वाढीशिवाय पर्याय नसल्याचा मतप्रवाह

कोल्हापूर : केंद्र सरकारने ऊस व साखर हे जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली आणले आहेत. त्यामुळे या दोन्ही वस्तूंचा दर ठरवण्याचा अधिकार सरकारकडे आहे. एकीकडे या उद्योगासाठी आवश्यक ऊस या कच्च्या मालाची किंमत वाढत असताना साखरेची किंमत स्थिर ठेवणे हे कोणत्याही उद्योगासाठी अर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. किंबहुना त्यामुळे हा उद्योग तोट्यात आणि आर्थिक गर्तेत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत यावर्षी वाढलेली प्रतिटन १०० रुपये एफआरपी द्यायची कशी? असा प्रश्न साखर कारखान्यांसमोर आहे. गेल्या सात वर्षापासून साखरेचा हमी भाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवर कायम आहे. या दरात वाढ झाल्यानंतरच एफआरपी देणे शक्य असल्याचे मत साखर उद्योगाने व्यक्त केले आहे. अन्यथा, थकीत एफआरपीचा आणि कारखान्यांवरील कर्जाचा बोजा वाढू शकतो, अशी भीती आहे.

सद्यस्थितीत साखर उद्योगावर आठ ते दहा हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. हे कर्ज कशातून फेडणार हा प्रश्न आहे. ही कर्जे फेडण्यासाठी केंद्र व राज्य शासन काय करणार यावरच या अभूतपूर्व संकटातून साखर उद्योग वाचू शकेल, असे मत साखर उद्योगाचे अभ्यासक विजय औताडे यांनी दैनिक ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले आहे. मागील आठ वर्षांत एफआरपीत ३२ टक्के वाढ झाली आहे. पण, त्याचवेळी साखर उत्पदनासाठी येणारा खर्च, पगार, इंधन याचे दर वाढले आहेत. याचा विचार करताना वाढलेली एफआरपी आणि साखरेचा दर यातील तफावत दूर करणे आवश्यक आहे. जे कारखाने अर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांच्याकडून पर्याय शोधले जातील. पण, जे कारखाने अगोदरच अडचणीत आहेत, त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यांना नव्याने कर्ज मिळवणेही अडचणीचे ठरणार आहे. यापूर्वीची केंद्र व राज्य सरकारच्या कर्जांची परतफेड करायची आहे. साखर, मोलॅसिस, बगॅस, सहवीज प्रकल्प, डिस्टलरी यातून येणारे उत्पन्न व उसाची एफआरपी व साखर उत्पदनासाठी येणारा खर्च याची गोळाबेरीज केली, तर वर्षानुवर्षे यात तूटच आहे, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here