सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा सहकारी साखर कारखान्याने राज्यातील सहकारी साखर उद्योगात सुवर्णइतिहास निर्माण केला होता. ‘हुतात्मा पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कारखान्याने सामाजिक, सांस्कृतिक, कृषी आणि सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, गेल्या २३ दिवसांपासून हुतात्मा साखर कारखान्यावर सुरू असलेले शेतकरी सभासदांचे ठिय्या आंदोलन तीव्र झाले आहे. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या कथित गैरकारभाराविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात गौरव नायकवडी व इतरांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आहेत. त्याला वैभव नायकवडी यांच्याकडून प्रत्युत्तरही देण्यात आले आहे.
गेल्या २३ दिवसांच्या या आंदोलनात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. एकेकाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील सर्वाधिक दर आणि कामगारांना ५० टक्के बोनस देण्याचा ऐतिहासिक विक्रमही हुतात्माने प्रस्थापित केला होता. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. सद्यस्थितीत कारखान्याचा प्रशासकीय कारभार उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. कारखाना सध्या अडचणीत आहे. त्यामुळे हे आंदोलन नवसंजीवनी ठरेल की अडचणीत भर घालणारे याबाबत शेतकरी, सभासदांत चर्चा सुरू झाली आहे.


















