नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रुपया मंगळवारी, 19 मे रोजी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी 96.53 स्तरावर बंद झाला. मजबूत डॉलर आणि जागतिक बाजारातील अनिश्चिततेचा थेट परिणाम रुपयावर दिसून आला. मंगळवारी रुपया 96.37 या स्तरावर उघडला आणि दिवसभरात सुमारे 25 पैशांच्या मर्यादित पट्ट्यात व्यवहार करत राहिला.
विदेशी चलन बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतातून डॉलरचा बाहेर जाणारा प्रवाह वाढला असून, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे रुपयावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे.वर्षाच्या सुरुवातीला रुपया सुमारे 89 च्या स्तरावर होता. मात्र यावर्षी आतापर्यंत रुपयामध्ये सुमारे 6 ते 7 टक्क्यांची घसरण झाली आहे.
केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी सांगितले की, मजबूत डॉलरची मागणी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपयावरील दबाव अधिक वाढला आहे. पुढील सहा महिन्यांत रुपया 91.70-92.00 या सपोर्ट स्तर आणि 98.60-99.50 या रेसिस्टन्स स्तराच्या दरम्यान व्यवहार करू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ आणि भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आता राजकारणापेक्षा प्रत्यक्ष आर्थिक धोरणांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 11.2 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. हे केवळ युद्धजन्य परिस्थितीमुळे झालेले नाही, तर मागील 22 महिन्यांत भारतातील निव्वळ परकीय थेट गुंतवणूक जवळपास शून्यावर आली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर महागाई आणखी वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.


















