महाराष्ट्र : अल निनोच्या सावटामुळे खरीप हंगाम धोक्यात; राज्य सरकारकडून आपत्कालीन तयारीला वेग

मुंबई : महाराष्ट्रात यंदाचा खरीप हंगाम अल निनोच्या प्रभावामुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत संभाव्य कमी पाऊस, पावसातील मोठे खंड आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असून विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग अधिक संवेदनशील मानले जात आहेत. जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता असली तरी पुढील महिन्यांत पावसाचे प्रमाण घटत जाणार असल्याने पिकांवर ताण निर्माण होऊ शकतो.

ChiniMandi WhatsApp Channel

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पावसाच्या दोन टप्प्यांमध्ये मोठा खंड पडण्याचा अंदाज असल्याने जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. जलयुक्त शिवारसारख्या योजनांद्वारे पावसाचे पाणी अडवून संरक्षित सिंचनासाठी वापरण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे यासाठी बँकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपात अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, तसेच पीककर्जासाठी सीबीलची अट लागू करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य सरकारने कर्जमाफी प्रक्रियेलाही गती देण्याचा निर्णय घेतला असून ३० जूनपर्यंत त्याची अंमलबजावणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २०१५ च्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ठेवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here