कृष्णा कारखाना निवडणूक : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची सावध रणनीती; विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढणार का ?

सातारा: सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जाणारी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या डॉ. सुरेश भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल यांच्यात थेट सामना रंगला आहे. मात्र या लढतीत कराड दक्षिणमधील काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण गट नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चव्हाण हे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, उघडपणे मैदानात उतरून भूमिका घेण्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण गट एखाद्या सक्षम गटाला पडद्यामागून पाठबळ देण्याची रणनीती आखत आहे. कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे संकेत देत योग्य वेळेची वाट पाहण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर कराड दक्षिणेतील काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांची ताकद यापूर्वी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील गटासोबत ठामपणे उभी राहिल्याचे दिसून आले होते. मात्र यंदा बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे परिस्थिती वेगळी आहे.यावेळी डॉ. इंद्रजित मोहिते गट निवडणुकीच्या रणांगणापासून दूर असल्याने काँग्रेस विचारसरणीशी जोडलेल्या सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक मित्रपक्ष आणि जुने राजकीय सहकारी थेट मैदानात नसल्याने मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दरम्यान, गेल्या काही वर्षांत कराड दक्षिणेतील काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीमुळेही पक्ष संघटना कमकुवत झाल्याची चर्चा आहे. अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी वेगवेगळे राजकीय पर्याय स्वीकारल्याने काँग्रेसची स्थानिक ताकद विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर उरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना एकत्र ठेवत योग्य निर्णय घेण्याचे मोठे आव्हान आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत ते काय भूमिका घेतात आणि आपल्या समर्थकांना कोणते निर्देश देतात, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील. सध्या तरी पृथ्वीराज चव्हाण समर्थक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून, त्यांच्या पुढील निर्णयाकडे कृष्णा कारखाना निवडणुकीचे राजकारण लक्ष ठेवून आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here