सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला जाहीर केला. कारखान्याच्या निवडणुकीतून आम्ही माघार घेत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. कराड येथे रयत संघर्ष मंचच्यावतीने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणुकीसाठी रयत संघर्ष मंचचा पाठिंबा असला, तरी मी कोणत्याही सभेच्या व्यासपीठावर जाणार नाही. या निवडणुकीत केवळ दोन वेळा दिसेन. त्यापैकी आज पत्रकार परिषद झाली. आणखी एक वेळा येईन. ते कधी, ते सांगता येणार नाही; परंतु, आमच्या विचारांचे लोक सहकार पॅनेलच्या पाठीशी राहतील, असे डॉ. मोहिते यांनी स्पष्ट केले.
मोहिते म्हणाले की, मोहिते म्हणाले की, कारखाना शेतकऱ्यांचा असून, त्यांचे हित साधायचे असेल, तर आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजेत. कारखाना चालवण्यासाठी चांगले नेतृत्व, कार्यक्षमता, अनुभव, प्रशासनावर नियंत्रण, आर्थिक शिस्त, कायद्याची जाण, चर्चा करण्याची तयारी अशा गोष्टी असाव्या लागतात. त्या सर्व सहकार पॅनेलमध्ये दिसत असल्याने, या पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यावेळी संचालक जयवंतराव सावंत, अशोकराव पाटील, जयवंत पाटील, प्रा. अनिल पाटील, मारूती निकम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. सुधीर जगताप, वाळवा, कडेगाव, विटा तालुक्यातील सभासद आणि रयत संघर्ष मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.
छाननीत १२२ अर्ज वैध, माघारीसाठी ९ जूनपर्यंत मुदत…
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण १३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांच्या छाननीत दाखल झालेल्या सहा हरकतींपैकी पाच हरकती मंजूर करण्यात आल्या आहेत. पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी जाहीर केला. संस्थापक पॅनेलचे उमेदवार सुरेश पाटील यांच्यावरील हरकत फेटाळण्यात ली. संस्थापक पॅनेलच्या उमेदवार डॉ. उमा देसाई व अविनाश पाटील यांचे अर्ज मात्र अवैध ठरले. १२२ अर्जवैध ठरले असून अर्ज माघारीची अंतिम मुदत ९ जून आहे.
छाननी प्रक्रियेदरम्यान विविध गटांतील उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये डॉ. उमा देसाई यांचे कराड अर्बन बँकेचे थकीत कर्ज असल्याने महिला राखीव व गट क्रमांक दोनमधील दोन्ही अर्ज अवैध ठरविण्यात आले. अविनाश पाटील यांना दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याने गट क्रमांक तीनमधील त्यांचे दोन अर्ज बाद करण्यात आले. महेश पवार व राजेंद्र पाटील यांच्या सूचकांवर कारखान्याची थकबाकी असल्याने अनुक्रमे गट क्रमांक चार व पाचमधील अर्ज नामंजूर करण्यात आले. विजय जयसिंग बल्लाळ यांचाही अर्ज थकबाकीच्या कारणावरून अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रवर्गातून अवैध ठरविण्यात आला.


















