कोल्हापूर : सद्यःस्थितीत उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात वाढ झाली आहे. विशेषतः वाढत चाललेले तापमान आणि जमीन हलकी अशा स्थितीत ऊस पिकामध्ये खोडकिडीचा धोका अधिक तीव्र होतो. अधिक उत्पादनासाठी उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत करणे आवश्यक असले तरी विविध अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांकडून लागवड उशिरा होते. अशा उशिरा लागवडीच्या आणि पाणीटंचाई असलेल्या क्षेत्रांमध्ये व खोडवा पिकातही खोडकिडीच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. खोडकिडीमुळे ऊस उत्पादनात २२ ते ३३ टक्के, साखर उताऱ्यात १२ टक्के, तर गूळ उत्पादनात २७ टक्के घट होते. मात्र, शेतकऱ्यांनी योग्य काळजी, नियमित निरीक्षण आणि सोप्या व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यास त्याचा प्रादुर्भाव प्रभावीपणे आटोक्यात आणता येतो. शेतकऱ्यांनी त्याकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सीनीअर रीसर्च फेलो पांडुरंग जगताप आणि राजर्षी शाहू महाजार कृषी महाविद्यालयातील किटकशास्र विभागप्रमुख डॉ. अभयकुमार बागडे यांनी केले आहे.
याबाबत जगताप व डॉ. बागडे यांनी सांगितले की, फेब्रुवारीनंतर ठेवलेल्या खोडव्यात, कमी पावसाच्या व जास्त तापमानाच्या परिस्थितीत जून-जुलै महिन्यांतही या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते. उन्हाळ्यात (मार्च ते मे) लागवडीत उच्च तापमानामुळे पिकांची प्रतिकारशक्ती कमी होते. उन्हाळ्यात परोपजीवी मित्र कीटकांची संख्या घटल्याने किडींचा प्रादुर्भाव वाढतो. खोडकिडीची एक पिढी ३० ते ४५ दिवसांत पूर्ण होतो. यासाठी तीव्र उन्हाळ्यात पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर कमी करणे : मार्च ते मे महिन्यांत पाण्याची कमतरता हा खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढण्याचा महत्त्वाचा घटक आहे. तथापि रुंद सरी पद्धत, ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धत वापरावी. जैविक नियंत्रणावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. एक आड एक सरींना पाणी देणे, कांदा, कोथिंबीर या आंतरपिकांचा वापर असे उपायही शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतात.


















