छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात सध्या गतवर्षी लागवड केलेल्या उसाच्या तोडणीची लगबग सुरू असून, तोडलेला ऊस ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या साहाय्याने साखर कारखान्यांकडे रवाना होत आहे. मात्र,पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या असून कूपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे. ऐन वाढीच्या व कांड्या भरण्याच्या महत्त्वाच्या काळात पिकाला पुरेसे पाणी देता न आल्याने उसाची अपेक्षित वाढ खुंटली आहे; परिणामी उसाची कांडी बारीक आणि वजन अतिशय कमी भरत आहे. दरवर्षी एकरी सरासरी ५० ते ६० टनांचे भरघोस उत्पादन देणारा ऊस यंदा पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे थेट ३५ ते ४० टनांवर आला आहे. उत्पादनात एकरी १५ ते २० टनांची मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे.
पाणी टंचाईमुळे उसाचे उत्पादन घटण्याबरोबरच पुढील हंगामातील ‘खोडवा’ कसा जगवायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. याबाबत विभागीय कृषी विस्तार केंद्राचे कृषी सहायक रामेश्वर ठोंबरे म्हणाले की, यंदा पावसाच्या खंडामुळे उसाच्या वाढीवर निश्चितच विपरीत परिणाम झाला आहे. नैसर्गिक वातावरणातील सततचे बदल, वाढती उष्णता आणि किडीचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. अनेक भागांत एकरी ५० टनांचे उत्पादन थेट २५ टनांच्या खाली घसरल्याचे दिसून येत आहे. मायगावचे शेतकरी शेषनारायण दसपुते म्हणाले की, ऊस उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले असून बळिराजा संकटात सापडला आहे. पाणीटंचाईसोबतच खते, मशागत आणि मजुरीचे दर गगनाला भिडल्याने उत्पादन खर्चही निघणे अशक्य झाले आहे. साखर कारखान्यांनी उसाला यंदा चांगला दर द्यावा आणि शासनानेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी मदत जाहीर करावी.

















