अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आणि मुळा सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सह. संचालक गाडे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन्ही साखर कारखान्यांत प्रत्येकी २१ संचालकांची निवड केली जाईल. ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक २७ जून तर मुळा कारखान्याची निवडणूक २६ जून रोजी होईल. ज्ञानेश्वर कारखान्याच्या शेवगाव, शहरटाकळी, कुकाणा, नेवासा, वडाळा आणि ढोरजळगाव या गटांतून संचालक निवडले जातील.
ज्ञानेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २६ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मंगेश सुरवसे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी २६ मे ते ३ जून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भेंडा येथील कारखाना स्थळावर आहे. अर्जाची छाननी दि. ३ जून रोजी होईल. ४ ते १८ जून सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १९ जून रोजी उमेदवाराची यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. २७ जून रोजी मतदान तर २८ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार आहे. तर मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २६ मेपासून सुरू झाली. २ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. ३ जून रोजी अर्जाची छाननी, तर १८ जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १९ जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप, तर २६ जून रोजी मतदान व २७ जून रोजी मतमोजणी होणार आहे.


















