सोलापूर : ऊस तोडणी मजूर पुरवठ्याच्या बहाण्याने २१ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या फरार संशयिताला वैराग पोलिसांनी बुधवारी (२७ मे) मुंबईतून अटक केली. संशयित जयंद्र जयचंद राठोड (रा. अमानपूर, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. याबाबत वैराग पोलिस स्थानकात विजय दिगंबर पवार (रा. खडकपुरा गल्ली, वैराग) यांनी फिर्याद दिली होती. तपासादरम्यान आरोपी मूळ गावी नसून फरार असल्याचे स्पष्ट झाले. मोबाइल लोकेशन व सीडीआरच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. लोकनेते साखर कारखाना, अनगर यांनीही जयंद राठोडविरुद्ध सुमारे ७ लाख रुपयांच्या फसवणुकीची लेखी माहिती पोलिसांना दिली.
ऊसतोड मजूर करारांमधील आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे वारंवार उघडकीस येत आहेत. वैराग स्थानकात विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित जयंद्र राठोड याने गळीत हंगा २०२५-२६ साठी १८ कोयते म्हणजेच ३६ ऊसतोड मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले होते. करारानुसार सुरुवातीला ३ लाख ५० हजार रुपये रोख अॅडव्हान्स घेतले. त्यानंतर जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान आरटीजीएसद्वारे आणखी १८ लाख १० हजार रुपये राठोडच्या खात्यावर पाठविले. मात्र कारखाना सुरू झाल्यानंतरही आरोपीने मजूर न पाठवता रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. लोकेशनच्या आधारे संशयित मुंबईत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वैराग पोलिसांनी शीव पोलिस ठाण्याच्या मदतीने सायन रुग्णालय परिसरातून संशयितास पकडले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.


















