नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसे संचलित अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल कंपनीने गळीत हंगामातील ऊस बिले जवळपास चार ते पाच महिन्यानंतरही दिलेली नाहीत. थकीत ऊस बिलांमुळे कोळगाव, देवगाव, सारोळे व थडी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगम व शेतकी अधिकारी अजित गुळवे यांनी गावोगावी भेटी देऊन शेतकऱ्यांकडून प्रतिटन ३२०० रुपये दराने ऊस खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी ऊस कंपनीकडे पाठवला. मात्र पैसे मिळत नसल्याने कंपनीकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन दिले.
अष्टलक्ष्मी शुगरच्या मालकासह व्यवस्थापनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. ऊस बिले न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँक कर्ज, शेती खर्च व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल कंपनीच्या मालक व व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करावा तसेच थकीत ऊस बिले तातडीने मिळवून द्यावीत, अशी मागणी निवृत्ती घारे पाटील, गजानन घोटेकर, शंकर कोंडाजी घोटेकर, प्रताप गवळी, प्रसाद गवळी, राजेंद्र कदम, रेवनसिद्ध लोहारकर, जयवंत लोहारकर, मंगेश फापाळे, पंकज दगडे आदींनी केली. यावेळी गोरक्षनाथ नागरे, जनार्दन नागरे, चंद्रकांत नागरे, नितीन सानप, रामदास गवळी, संदीप डोंगरे, विजय घोटेकर, नंदू वाघ, आत्माराम वाघ, दशरथ घोटेकर, मयूर गवळी, रावसाहेब घोटेकर, बाबासाहेब वाघ, हनुमान दंडाळ, पंढरीनाथ नागरे आदी उपस्थित होते.















