नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील वस्त्रोद्योगाला दिलासा देण्यासाठी 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत वस्त्रोद्योगासाठी कापसाची उपलब्धता वाढवणे आणि उत्पादकांचा कच्चा माल खर्च कमी करणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आयात होणाऱ्या कापसावर लागू असलेले मूलभूत सीमाशुल्क तसेच कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर यामधून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय वस्त्रोद्योगासाठी पुरेशा प्रमाणात कापूस उपलब्ध व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वस्त्रोद्योग आणि रेडिमेड कपडे क्षेत्रातील उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या तात्पुरत्या शुल्क सवलतीमुळे वस्त्रोद्योगातील कच्च्या मालाचा खर्च कमी होईल. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळेल आणि ग्राहकांनाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाही विचार या निर्णयात करण्यात आला आहे.
सरकारने स्पष्ट केले की या निर्णयाचा सर्वाधिक फायदा लघु आणि मध्यम उद्योगांना (SMEs) होणार आहे. कापसाचा स्थिर पुरवठा उपलब्ध झाल्यास वस्त्रोद्योगाची उत्पादन क्षमता आणि बाजारातील स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होईल.हा निर्णय सीमाशुल्क कायदा 1962 आणि वित्त कायदा 2021 अंतर्गत महसूल विभागाने जारी केला आहे. सार्वजनिक हित लक्षात घेऊन ही सवलत देणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.भारताचा वस्त्रोद्योग आणि परिधान उद्योग हा देशातील सर्वात मोठ्या उत्पादन क्षेत्रांपैकी एक असून कापसाचा मोठा ग्राहक आहे. देशांतर्गत कापसाचा तुटवडा किंवा वाढलेल्या किमतींच्या काळात आयात खर्च कमी करण्याची मागणी उद्योग क्षेत्राकडून सातत्याने केली जात होती.


















