संतुलित फीडस्टॉक धोरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी उत्पादकता वाढविणे गरजेचे : SEIC 2026 मध्ये तज्ज्ञांचे मत

मुंबई : भारतातील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचा विस्तार आणि जैवऊर्जा क्षेत्रातील वाढत्या विविधीकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञांनी फीडस्टॉक निवडीत संतुलित दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि कृषी उत्पादकता वाढविण्याची गरज अधोरेखित केली. ही चर्चा शुगर इथेनॉल बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स (SEIC) 2026 मधील “द फीडस्टॉक फिक्स” या परिसंवादात झाली. या चर्चेत फीडस्टॉक कोणताही असला तरी इथेनॉलसाठी समान दर, इथेनॉल निर्मितीत मक्याची वाढती भूमिका, अन्न विरुद्ध इंधन वाद, विद्यमान उत्पादन क्षमतेचा वापर आणि इथेनॉल उत्पादनासाठी सर्वाधिक प्रभावी फीडस्टॉक मिश्रण ओळखण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांची भूमिका अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

ऊस आणि मका दोन्ही आवश्यक…

ChiniMandi WhatsApp Channel

उत्तम शुगर मिल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक एस. एल. शर्मा यांनी इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात मक्याला वाढते प्राधान्य दिले जात असल्याबाबत चिंता व्यक्त करताना संतुलित दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली.“मक्याला ऊसापेक्षा अधिक प्राधान्य दिले जात आहे. मात्र इथेनॉल मिश्रण कार्यक्रमासाठी मका आणि ऊस दोन्ही आवश्यक आहेत आणि त्यामुळे इथेनॉल मिश्रण कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही,” असे शर्मा म्हणाले. त्यांनी सांगितले की, पिकांमध्ये स्पर्धा निर्माण करण्याऐवजी उत्पादकता वाढविण्यावर भर दिला पाहिजे. “शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ऊस आणि मका या दोन्ही पिकांची उत्पादकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

विविध फीडस्टॉकमुळे ऊर्जा सुरक्षेला बळ…

‘केअरएज’चे संचालक सब्यसाची मजूमदार यांनी सांगितले की, भारताची खरी ताकद विविध प्रकारच्या फीडस्टॉकमध्ये आहे. दीर्घकालीन शाश्वतता साधण्यासाठी सर्व ऊर्जा स्रोतांचा समांतर विकास आवश्यक आहे.“आपल्याकडे विविध प्रकारचे फीडस्टॉक उपलब्ध आहेत. सर्व ऊर्जा स्रोतांचा समान विकास करणे आणि आत्मनिर्भरतेसाठी कृषीआधारित ऊर्जेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या मते, हरित ऊर्जा उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनविण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल.

कृषी आणि उद्योग क्षेत्रात AI ची वाढती भूमिका…

फाइंडेबिलिटी सायन्सेसचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक डॉ. मंदार कुलकर्णी यांनी कृषी आणि औद्योगिक व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरावर प्रकाश टाकला. “गेल्या पाच वर्षांपासून आम्ही ऊस क्षेत्रात AI चा वापर करत आहोत. साखर आणि उत्पादन क्षेत्रासाठी विविध मॉडेल्स विकसित केली आहेत,” असे त्यांनी सांगितले. AI हे मानवी कौशल्याचा पर्याय नसून सहाय्यक साधन असल्याचे स्पष्ट करत त्यांनी म्हटले कि, “AI सहवैमानिक आहे, तर माणूस मुख्य वैमानिक आहे.”कुलकर्णी यांच्या मते, डेटा-आधारित प्रणाली सिंचन व्यवस्थापन, कार्यक्षमता वाढ आणि जलसंवर्धन यांसारख्या क्षेत्रांत अधिक चांगले निर्णय घेण्यास मदत करू शकतात.

कमी संसाधनांत अधिक उत्पादनावर भर…

आयसीएआर–भारतीय मका संशोधन संस्था (ICAR-IIMR) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकर लाल जाट यांनी वैज्ञानिक हस्तक्षेपांच्या माध्यमातून कृषी उत्पादकता वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी यांत्रिक पेरणी, प्रभावी तण व्यवस्थापन आणि जलसंवर्धनाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.“कमी संसाधनांत अधिक उत्पादन घ्या,” असा संदेश त्यांनी दिला.अन्न विरुद्ध इंधन या चर्चेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विविध फीडस्टॉक वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी वापरले जातात आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणांची गरज असते.

“विविध फीडस्टॉकचे दर वेगवेगळे असतात. अन्न विरुद्ध इंधन हा वाद कायम असतो. तांदूळ आणि गहू ही अन्नपिके आहेत, तर मका हे औद्योगिक पीक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच त्यांनी उद्योग क्षेत्राला संशोधन संस्थांसोबत सहकार्य करून फीडस्टॉक आणि उत्पादनाशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले.या सत्राचे सूत्रसंचालन जेके ग्रुपच्या एव्हीपी (मीडिया आणि कम्युनिकेशन विभाग) पार्श्वती साहा यांनी केले. चर्चेतून हे स्पष्ट झाले की भारतातील इथेनॉल क्षेत्राचा विकास एखाद्या एकाच फीडस्टॉकवर अवलंबून नसून विविध फीडस्टॉक, आधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यांवर आधारित असेल. ही रणनीती शेतकऱ्यांचे उत्पन्न, ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वत विकास यामध्ये संतुलन राखण्यास मदत करेल.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here