कोल्हापूर : केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह हे 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि भारतीय जनता पक्षाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या दौऱ्यादरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगासमोरील विविध प्रश्न केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडले जाणार आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि उद्योगासमोरील आव्हानांबाबत अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
अमित शाह यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच इचलकरंजी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या नामकरणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला.कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र हा राज्यातील प्रमुख साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. देशाच्या एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे साखर उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींना केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णयांची अपेक्षा आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मते, साखर निर्यात धोरण अधिक अनुकूल करणे, इथेनॉल उत्पादनातील गुंतवणूक वाढवणे, पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवणे, साखरेचा किमान विक्री दर (MSP) आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रास्त व लाभदायक दर (FRP) संदर्भातील समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.ते म्हणाले की, देश अजूनही ऊर्जा गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातित खनिज तेलावर अवलंबून आहे. त्यामुळे इथेनॉल क्षेत्र अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.
जवाहर साखर कारखान्याचे होणार नामांतर…
दौऱ्यादरम्यान हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याचे नामांतर करून त्याला माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नाव देण्याचा कार्यक्रमही प्रस्तावित आहे. अलीकडेच आवाडे कुटुंबीयांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कारखान्याचे नाव बदलून “कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी साखर कारखाना” असे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


















