छत्रपती संभाजीनगर : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात १७ लाखांचा भेसळयुक्त, खराब गूळ जप्त झाल्यावर तेथील गुऱ्हाळ मालकांनी ४०० गुऱ्हाळे बंद केली. हे समजताच येथे, शहरातील विक्रेत्यांनी त्यांच्या गोदामातील काळ गूळ रातोरात गायब करून टाकला. त्यानंतर गेल्या आठवडाभरात एकही ट्रक बाजारात दाखल झाला नाही. शहरातील पाणीपुरीवाले, हातभट्टीवाले काळा गूळ मोठ्या प्रमाणात खरेदी करत. आता तो बंद झाल्यामुळे गावरान गुळाला मागणी वाढली आहे. याशिवाय, हॉटेल व्यावसायिकांनी अनलॉग चीज वापरत नसल्याचे फलक लावले आहेत.अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) धडक कारवाईने शहरातील खाद्यपदार्थाच्या बाजारपेठेचे चित्रच बदलून टाकले आहे.
सद्यस्थितीत अशुद्ध, भेसळीच्या संशयामुळे काळा गूळ बाजारातून गायब झाला आहे. याशिवाय अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने वनस्पती तुपात कृत्रिम सुगंध मिसळून ‘गावरान तूप’ म्हणून विक्री करणाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. भेसळयुक्त पनीर व दुधावर कारवाई सुरू झाल्याने कंपन्यांचे पाकीटबंद तूप, पनीर व दुधाला ३० टक्क्यांनी मागणी वाढली आहे. शहरातील अनेक हॉटेल्सनी ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रवेशद्वारावर आम्ही अनलॉग चीज वापरत नाही अशा पाट्या लावल्या आहेत. याचबरोबर किरकोळ बाजारातून खुली विक्री होणारे पनीर, तूप मागील काही दिवसांपासून गायब झाले आहे. त्यामुळे पाकीटबंद वस्तूची मागणी वाढली आहे.















